पुणे : आपला परिसर आणि तरंगिणी सांस्कृतिक प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने गायक व संगीतकार पं. जितेंद्र अभिषेकी यांच्या नावाने होणा-या तीन दिवसीय संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. याबरोबरच संगीत क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कलाकारांना “पं. जितेंद्र अभिषेकी” या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. अशी माहिती पं. हेमंत पेंडसे यांनी पत्रकार परिषदेत दिली.यावेळी बोलताना पेंडसे म्हणाले, हा महोत्सव दि. २९ ते ३१ मार्च रोजी यशवंतराव नाट्यगृह, कोथरूड, येथे संपन्न होणार आहे. महोत्सवाचे उद्घाटन ज्येष्ठ आणि प्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या हस्ते होणार आहे. यावर्षी ज्येष्ठ गायक, कलाकार पं. सुहास व्यास यांना पं. जितेंद्र अभिषेकी हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. यासोबतच “प्रथितयश गायिका पुरस्कार” सानिया पाटणकर यांना प्रदान करण्यात येणार आहे. संगीत क्षेत्रातील कार्यक्रमांचे यशस्वी पणे संयोजन करणारे गोविंदराव बेडेकर यांना “यशस्वी संयोजक” हा पुरस्कार तर मोहनकुमार दरेकर यांचा षष्ठ्यब्दीपूर्ती निमित्ताने सत्कार केला जाणार आहे.